अमेरिकेचे वाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

 मुंबईदि. १४ : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आर्थिक व राजकीय सहकार्य, व्यापार व गुंतवणूक, राज्यातील विद्यापीठांचे अमेरिकन विद्यापीठांशी सहकार्य तसेच कौशल्य विकास या विषयांवर द्विपक्षीय चर्चा झाली.

माईक हँकी यांनी राज्यपालांशी संभाषणाची सुरुवात तामिळ भाषेत करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांना सुखद धक्का दिला. विद्यार्थी आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत 30 वर्षांपूर्वी आपण एक वर्ष तामिळनाडू येथे शिक्षण घेतले व तेथे आपण तामिळ भाषा शिकल्याचे माईक हँकी यांनी राज्यपालांना सांगितले.

अमेरिकेचा मुंबईतील वाणिज्य दूतावास हा आपल्या देशाचा जगातील सर्वात मोठ्या दूतावासांपैकी असून गेल्या वर्षी मुंबईने सर्वाधिक भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षी कुलगुरू व अमेरिकेतील विद्यापीठांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते असे सांगून हे शैक्षणिक सहकार्य अधिक वाढावे या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्य विकास क्षेत्रात देखील अमेरिका राज्यातील आयटीआय व राज्य कौशल्य विद्यापीठासोबत कार्य करीत असल्याचे माईक हँकी यांनी सांगितले. यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अमेरिका भारतात महिला उद्यमशीलता, कृषी व अन्नप्रक्रिया, आरोग्य सेवा, स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेच्या वाणिज्यदूतांचे स्वागत करताना राज्यातील विद्यापीठे व अमेरिकेतील विद्यापीठांमधील सहकार्य वाढविताना विद्यार्थी आदानप्रदान तसेच तज्ज्ञ व अध्यापक आदानप्रदान वाढविले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. अमेरिकेने भारताशी सौर ऊर्जा, औषध निर्माण व  वस्त्रोद्योग या क्षेत्रात देखील गुंतवणूक वाढवावी,अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी अमेरिकन वाणिज्य दूतावासातील राजकीय आर्थिक प्रमुख रिचा भला, राजकीय अधिकारी रायन म्यूलन व राजकीय सल्लागार प्रियंका विसरिया – नायक हे देखील उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *