जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू; खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देणार
केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
कोल्हापूर, दि.11(जिमाका): ‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या स्वप्नीलला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना सॅल्युट.. ! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू असून खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल थ्री प्रकारात नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल त्याच्या आई अनिता व वडील सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजापूर येथे झालेल्या घटनेत नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना एकूण एक कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 20 नुकसानग्रस्तांना 53 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच जुलै 2024 मधील महापुरात शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड ओढ्याच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन मृत झालेल्या सुहास पाटील, अण्णासो हसुरे व इकबाल बैरागदार यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मध्यमवर्गीय असणाऱ्या स्वप्नील च्या आई-वडिलांनी स्वप्निल ऑलिंपिक पर्यंत पोहोचण्यासाठी आजवर खूप कष्ट सोसले आहे. प्रसंगी कर्ज काढून त्याच्यासाठी रायफल, बुलेट व आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून स्वप्नील ने आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले आहेत. राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वप्नीलच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
केशवराव भोसले नाट्यगृहाची हेरिटेज वास्तू उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाट्य कलाकारांसाठी उभं केलेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे एक प्रकारचं वैभव होतं. त्या काळात शाहू महाराजांनी हे नाट्यगृह अत्यंत दर्जेदार पद्धतीने उभारलं होतं. आगीमुळे या नाट्यगृहाचे प्रचंड नुकसान झालं आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ कोल्हापूरच नाही तर राज्यभरातील कलाकारांचं घर होतं. या नाट्यगृहाविषयी असलेल्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. कलाकार आणि कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे नाट्यगृह अद्ययावत पद्धतीने जसं आहे तसं हेरिटेज पद्धतीने लवकरात लवकर साकारण्यात येईल. हे नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे व पाच कोटी विम्याची रक्कम मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तथापि दर्जेदार पद्धतीने बांधकाम करताना निधीची कमतरता भासल्यास अधिकचा निधीही देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेल्या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विशाळगड अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवारण्यासाठी जागतिक बँकेने 3200 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, यातून पूर निवारण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगून त्यांनी जिल्ह्याशी संबंधित विविध बाबींचा उहापोह केला.
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
****