‘अवयवदान दिवस’….मरावे परी शरीर मागे उरावे

शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे, असे म्हणतात.. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन हजारोंना सृष्टी बघायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयवदान करणे आहे. जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळचा नातेवाईक अवयवदान करून गरजू व्यक्तीला ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून अवयवाची मदत करतात त्याला अवयवदान म्हणतात.

18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या स्वेच्छेने शासनाला सांगून अवयव दान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत:निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

अवयव दान का करावे.. ?

जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण एके दिवशी जग सोडून जाणार आहोत. आपला मृत्यू अटळ आहे. तो कोणालाही टाळता येणार नाही. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगलो. मृत्यूनंतर आपले शरीर जाळून राख करताना देखील आपण तीन क्विंटल लाकडासाठी तेरा वर्षे वयाची झाडे नष्ट करतो. प्रदूषण वाढविण्यात कारणीभूत ठरतो. हे आता परवडणारे नाही. त्यामुळे काही ठिकाणी मृतदेह लाकडाने जाळण्याऐवजी व्हाईट् कोलने जाळला. पुणे, नागपूरने व्हाईट कोलचा प्रयोग यशस्वी केला. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात 2019 मध्ये 589 मृतदेह व्हाईट कोलने दहन केले. तसा प्रयोग नांदेड महानगरपालिकेने करावा अशी अपेक्षा आहे.

परंपरा, रूढीचे अडथळे दूर सारा

अवयवादांना दुसरा मोठा अडथळा परंपरा, रुढी, अंधश्रद्धेचा आहे. आपला समाज परंपरा प्रिय असला तरी बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून मानसिकता बदलली तर सर्वांचे कल्याण होईल. शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेला अवयवदानाच्या विषयी प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे. परंपरा आणि रूढीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक अवयदानाविषयी तर्क वितर्क मांडून अवयवदान करण्याला बगल देतात. शिवाय विविध धर्माच्या रीती रिवाजानुसार अंत्यविधीचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे अवयवदानाला अडथळे येतात. देशातील सर्वच धर्मगुरूंनी जरी अवयवादानाला समर्थन दिले असले तरी सर्वसामान्य जनतेची मानसिकता सहजासहजी बदलणार नाही. मानसिकता बदलासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची गरज आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामसभेत यासाठी ठराव होणे आवश्यक आहे. शाळांपासून अवयवदानाच्या चर्चेचा विषय मना-मनामध्ये रुजविण्याचे कार्य गरजेचे आहे.

अवयव दान तीन प्रकारे करता येते

जीवंतपणी : रक्त, यकृत ,स्वादुपिंड, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि आतड्याचा काही भाग दान केल्या जाऊ शकतो.

नैसर्गिक मृत्यूनंतर : नेत्र आणि त्वचा याशिवाय हृदयाची झडप, त्वचेखालील आवरण, बंद कानातील हाडे, रक्तवाहिन्या दान केल्या जाऊ शकतात.

ब्रेनडेथ नंतर : नेत्र पटले, कर्ण पटल, मूत्रपिंड, त्वचा, हाडे, हात, पाय, गर्भाशय, यकृत, हदय स्वादुपिंड आणि आतडे

ब्रेन डेडचा निर्णय घेणारी सरकारी समिती छत्रपती संभाजीनगर येथे आहे. झोनल ट्रान्स प्लांट को-ऑर्डिनेशन समिती पाच तासात रुग्णालयाशी, प्रशासक निवासी डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर यांची व्यवस्था करते. ज्यांना अवयवदानाची करण्याची इच्छा आहे त्यांनी या समितीकडे नाव नोंदणी गरजेचे आहे.

शासन स्तरावरही प्रयत्न सुरू

1984 ला भारत सरकारने अवयवदानाच्या कार्यालयाला मंजुरी दिल्यानंतर पंधरा वर्षानंतर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन देशाला अवयव दानाचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परिवारासह मुंबईतून या महाअभियानाला सुरूवात केली. राज्यात सध्या अवयवादानासाठी कार्य करणाऱ्या 25 सेवाभावी संस्था आहेत. यामध्ये  फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि सुनील देशपांडे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांनी अवयवदानासाठी नऊ पदयात्रा काढल्या. 4 हजार किलोमीटर प्रवास केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, प्रत्येक अवयवदात्याच्या अंत्यसंस्काराला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्याला शहिदाचा सन्मान द्यावा. दुखी परिवाराचे सांत्वन करून भावनिक आधार द्यावा. त्यामुळे शासन, प्रशासन या चळवळीच्या पाठीशी आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना अवयवादानाची प्रक्रिया सुलभ करावी. प्रत्येक रुग्णालयात अवयवदानाचा स्वतंत्र कक्ष सुरू करून तज्ञाची नेमणूक करावी. लोकांना अवयवदान करण्यासंदर्भातील पत्रे उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर देखील मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील जनजागृती होत असून नांदेडमध्ये आम्ही यासाठी झटत आहोत. या आमच्या अवयवदान यज्ञाला आपल्या स्वीकृतीचे दान मिळावे ही अपेक्षा आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. आपल्याला स्वतः सुरुवातीला यासंदर्भात स्वीकृती द्यावी लागते. त्यानंतर मृत्यू पश्चात नातेवाईकांनी याबाबत संबंधितांना माहिती देणे आवश्यक आहे.

नांदेडची मोहिमेत आगेकूच

17 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड पहिले अवयवदान सुधीर रावळकर यांचे झाले. त्यानंतर 3 जुलै 2024 रोजी अभिजीत ढोकेचे अवयदान झाले. अवयवदानाच्या प्रचारात आपण स्वतःही 2017 पासून वाहून घेतले आहे. या मोहिमेत जिल्ह्याच्या  यशात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची यंत्रणा व शहरातील खासगी वैद्यकीय संस्थांनी देखील आपले दायित्व निभवले आहे. नांदेड मधील एका खाजगी हॉस्पिटलने तर परवा सहावे अवयव दान करून ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. नांदेडमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी अवयदानाला स्वीकृती दिली आहे. नांदेडमध्ये सामान्य नागरिकाला कोणालाही अवयव दान करायचे असेल तर आपल्या हयातीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपुरी याठिकाणी आपला अर्ज देता येतो. आपल्या पश्चात आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने मृतदेह देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. यासंदर्भातले स्वतंत्र व विस्तृत लिखाण मी स्वतः केले आहे. याबाबतचे विपुल साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. नागरिकांना ते दिले जाऊ शकते. मात्र या एका अभियानात अगदी शाळकरीवयापासून प्रबोधन होण्याची गरज वाटत असून आजच्या अवयवदान दिनाला याबाबतची वचनबद्धता मनामनात व्हावी हीच अपेक्षा.

00000

माधव अटकोरे

ज्येष्ठ पत्रकार, नांदेड

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *