पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत सहभागासाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई दि. २९ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे प्रारंभीक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आयोजित करण्यात आली आहे. या योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना रू १ लाख ते रू २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील इच्छुक महिला स्टार्टअप्सनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील होतकरू महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करणेसाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे व देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील स्टार्टअप असावेत , महिला संस्थापक यांचा किमान ५१ % वाटा असावा,कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत ३० जून २०२३ पूर्वीची नोंदणी आवश्यक,वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी पर्यंत असावी ,आश्वासक, नाविन्यपूर्ण,प्रभावी व रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य,राज्य शासनाच्या इतर योजनेतील अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा हे या योजनेचे पात्रता निकष आहेत. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.

महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे . औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत इनक्यूबेटर्सची स्थापना, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतही महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *