नागपूर, दि. ०१: प्रदूषणमुक्त आणि हिरवेगार नागपूरच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण महाअभियानाचा शुभारंभ राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकभवन परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण महाअभियानाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्यसभा खासदार माया इवनाते, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दडके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, उपवनसंरक्षक विनिता व्यास, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ऑक्सिजनची पातळी वाढवणे, तापमान कमी करणे आणि जैवविविधतेचे जतन करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘एक माणूस, एक झाड’ या भावनेने प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करणे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक हिरवागार परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हाती घेतलेले हे वृक्षारोपण अभियान ‘हरित नागपूर’च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
००००
जिमाका, नागपूर