कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणीपातळी उद्यापर्यंत अंदाजे ३० ते ३२ फूट होण्याची शक्यता

सांगली, दि. ०१ (जि.मा.का.): कृष्णा, कोयना व वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून, आज १ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी २६ फूट २ इंच इतकी नोंदविण्यात आली आहे. नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सध्या कोयना धरणातून ३३,८२६, धोम धरणातून ८,२१९, कण्हेर धरणातून ६,०७२, उरमोडी धरणातून ४,९६२, तारळी धरणातून ३,५९६ व वारणा धरणातून ६,९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. ३१ जुलै २०२६ रोजी मुक्त व धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीच्या आयर्विन पूल येथील पाणीपातळीत वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे ३० ते ३२ फुटांपर्यंत होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील ०२३३-२३०१८२०, २३०२९२५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *