शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संवाद वारी’ हा उपक्रम महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीचे काम चांगले

सोलापूर, दि. १६ (जिमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने शासकीय योजनांच्या प्रचार प्रसिद्धीसाठी ‘संवाद वारी’ हा उपक्रम राबवला जात आहे. या माध्यमातून राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचीही प्रचार प्रसिद्धी चांगल्या प्रकारे होत आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संवाद वारी’ सारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे आयोजित ‘संवाद वारी’ या शासकीय योजनेच्या प्रदर्शन स्टॉलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योजनांची प्रसिद्धी कशा पद्धतीने केली जात आहे याची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, पुणे विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संवाद वारी हा उपक्रम पुणे येथून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी यांच्या समवेत शासकीय योजनांची प्रसिद्धी करत इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळे या पालख्या समवेतच्या प्रवासातील विसावा व मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गात येणाऱ्या विविध गावातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यास मदत झालेली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ ही अशा प्रसिद्धीमुळेच तळागाळापर्यंत पोहोचत आहे. माहिती विभागाचे प्रचार प्रसिद्धीचे कामही चांगले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माहिती उपसंचालक श्री पाटोदकर यांनी माहिती विभागाच्या संवादवारी या उपक्रमाची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली तसेच या प्रदर्शन स्टॉलमध्ये लावण्यात आलेल्या विविध योजनांविषयी माहिती दिली.

प्रारंभी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संवाद वारी उपक्रमातील विविध योजनांची पाहणी केली व ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना सर्वदूर पोहोचवून एकही पात्र बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *