स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीद राजगुरू यांचे स्मारक प्रेरणादायी ठरणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ११: हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अतुलनीय आहे; भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी पत्करलेल्या  हौतात्म्याचे  स्मरण नव्या पिढीला सातत्याने होत राहावे या दृष्टीने राजगुरूनगर येथे निर्माण होणारे स्मारक देशातील नागरिकांसाठी ऊर्जा केंद्र होईल, असा विश्वास व्यक्त करत राजगुरुनगर जन्मस्थळ परिसर विकास 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सादर करताना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

या स्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही याबाबत आश्वस्त करत मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यासंदर्भात 13 मार्च 2023 ला अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शासन कटिबद्ध असून स्मारक विकासाचे कार्य प्रगतीपथावर आहे. यासंदर्भात सर्वकष अभ्यास करून करून अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली काही सदस्यांसह समिती गठित करण्यात आल्याचे सांगितल. या कामाला गती मिळण्याच्या दृष्टीने सातत्याने आढावा बैठाका घेऊन जलद गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की,  1 जुलै 2023 रोजी स्मारक स्थळास प्रत्यक्ष भेट देत सल्लागारांमार्फत तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे सादरीकरण बघितले; त्याचवेळी पालकमंत्री पुणे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्याच्या 254 कोटी 11 लक्ष रुपयांच्या प्रस्तावास 31 जुलै 2023 रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने समितीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या बाबतचा 102 कोटी 48 लक्ष किमतीच्या पहिल्या टप्प्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समिती समोर मान्यतेसाठी ठेवण्याची शिफारस केली.

या विकास आराखड्याच्या 102 कोटी 48 लक्ष किमतीच्या पहिल्या टप्प्यास 10 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या शिखर समितीने मान्यता दिली. या आराखड्यामध्ये स्मारकाचा जीर्णोद्धार,जन्म खोली, थोरला वाडा, तालीम, मुख्य दरवाजा, राम मंदिर, वाचनालय, सुविधा गृह, उपहारगृह यांसह नदी परिसर सुधारणा राम घाट चांदोली घाट व त्याकडे जाणारा दरवाजा, संरक्षित भिंत व वाहनतळ, अंतर्गत रस्ते, खुले सभागृह, पुतळे, स्मारक, प्रकाश व्यवस्था व ध्वनि शो इत्यादींसाठी 82.35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून भूसंपादनासाठी 20.13 कोटी रुपये  इत्यादी बाबी या आराखड्याच्या कामामध्ये समाविष्ट आहेत.

या आराखड्याच्या अंमलबजावणी व सह नियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती, आणि जिल्हाधिकारी, पुणे तथा सनियंत्रण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे.

या आराखड्यातील मंजूर कामे 31 मार्च 2026 पूर्ण करण्यात येतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

या स्मारकाच्या विकासासाठी पुरातत्व विभागाच्या कार्यक्षेत्रातील 36.45 कोटी किमतीच्या दोन कामांच्या सविस्तर अंदाजपत्रकांना 14 फेब्रुवारी 2024 रोजी जिल्हाधिकार्यालय पुणे यांनी प्रशासकीय मान्यता दिलेली असून या कामांची 16 फेब्रुवारी 2024 रोजी निविदा देखील प्रकाशित करण्यात आली होती.

2024 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सदर कामांच्या निविदा अंतिम करून 15 मार्च 2024 रोजी 31.21 कोटी इतक्या रकमेच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती देखील मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी या स्मारकाच्या प्रगती अहवालात स्पष्ट केले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *