आम्ही जेष्ठ मागे नाहीत.. तुम्हा तरुणांना काय झाले?

नांदेड दि. २३ : आम्ही ज्येष्ठ झालो आहोत. अनेकांना मतदान केंद्रापर्यंत जाणेही शक्य नसते. मात्र अनुभवावरून सांगतो, लोकशाहीला मतदानाची संजीवनी हवी असते, त्यामुळे आम्ही मतदान केंद्रावर जाणार आहोत 26 एप्रिलला मतदान करणार आहोत, तरुणांनी मागे राहायला नको, असे आवाहन नांदेडच्या ज्येष्ठ नागरिकांनी तमाम जिल्हावाशियांना केले आहे.
आपले मतदान हे आपला पाठिंबा. आपला विरोध. आपली तटस्थता. व्यक्त करण्याची सनदशीर तरतूद लोकशाहीमध्ये आहे. जे मनात आहे ते ईव्हीएमचे बटन दाबून उमटू द्या. निर्भय होऊन मतदान करा. घरी बसून राहू नका, असे आवाहन ज्येष्ठांनी केले आहे.
स्वीप उपक्रमांतर्गत मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेच्या आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

आज जिल्ह्यासह महानगरातील ज्येष्ठ नागरिकांसोबत सीईओ मीनल करनवाल यांनी संवाद साधला. निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील ज्येष्ठांसाठी घरून मतदान करण्याची व्यवस्था केली होती. मात्र अनेक ज्येष्ठांनी मतदान केंद्रावरूनच मतदान करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांचा उत्साह या संवादात दिसून आला. यावेळी अनेक ज्येष्ठांनी माध्यमांच्याद्वारे महानगरातील सर्व नागरिकांना विशेषता तरुणांना साद घातली. मतदानासाठी बुथवर पोहोचा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी आज काही वृद्धाश्रमांना देखील भेटी दिल्या. काही ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी त्यांना भेटायला जिल्हा परिषदेमध्ये आले होते सर्वांनी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन सिईओ करनवाल यांना दिले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *