मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करावे – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मुंबई जिल्हा प्रशासनाची मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांना मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणाच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी अप्पर आयुक्त कोकण विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड ,उपजिल्हाधिकारी अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, अप्पर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी) उन्मेष महाजन, सर्व शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, सर्व अधिकाऱ्यांनी स्वत: मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करून मुलभूत सुविधांच्या उपलब्धतेची खात्री करावी व आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची दुरुस्ती करावी. सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, रॅम्प आदींची व्यवस्था करण्यात यावी. दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांची मतदार केंद्र निहाय संख्या लक्षात घेवून त्याठिकाणी व्हील चेअर, वाहतूक इत्यादी बाबतचे नियोजन करावे. तसेच वेब कास्टिंगसाठी निवडलेल्या मतदान केंद्रांचा आढावा मतदान केंद्रावर सीसीटीव्ही किंवा व्हिडिओग्राफीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. प्रत्येक मतदान केंद्रावर  प्राथमिक वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होऊ शकतील, याबाबत देखील नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी दि. 23 एप्रिल 2024 पर्यंत आहे, यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नवमतदार जनजागृती विशेष मोहिम राबवून नवमतदार नोंदणी वाढवावी.

आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigil हे मोबाईल ॲप विकसित केले आहे.   या ॲपमध्ये नागरिकांनी नोदविलेल्या तक्रारी व यावरील केलेल्या कार्यवाहीबाबत आढावा  बैठकीत घेण्यात आला.

मतदार जनजागृती स्वीप, मनुष्यबळ, वाहने, टपाली मतपत्रिका, आचारसंहिता, ईव्हीएम मशीन, मतदान केंद्र नियोजन, कायदा व सुव्यवस्था,  स्ट्राँग रुम व्यवस्था, दिव्यांग मतदार सुविधा एनजीपीएस पोर्टल वरील तक्रारी,रूट मॅप आदींबाबत जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी बैठकीत सविस्तर आढावा घेतला.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *