कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, १२: नामवंत लेखक व कादंबरीकार कृष्णात खोत  यांना ‘रिंगाण’ कादंबरीसाठी मराठी भाषेकरिता  साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.

कमानी सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार 2023 चा सादरीकरण सोहळा हे महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले. ओडिसा राज्याच्या प्रख्यात साहित्यिक व प्रमुख पाहुण्या प्रतिभा राय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कमानी ऑडिटोरियम येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष श्रीमती कुसुम शर्मा तसेच सचिव, के. श्रीनिवासराव मंचावर उपस्थित होते. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नाव लौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कॉपर्निकसमार्ग स्थित साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 साठी साहित्य पुरस्कार सोहळा पार पडला. अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 24 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कृष्णात खोत यांच्या लेखन कार्याविषयी

श्री कृष्णात खोत यांना मराठी कादंबरी ‘रिंगाण’ करिता साहित्य अकादमीतर्फे गौरविण्यात आले. त्यांना प्रतिभा राय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत. पन्हाळा विद्यामंदिर येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. सध्या ते कळे येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकवितात.

कृष्णात खोत हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रदेश समूहनिष्ठ कादंबरी लेखनाने ‘कादंबरीकार कृष्णात खोत’ म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शतकारंभी श्री. खोत यांनी त्यांच्या लेखन कार्याला सुरूवात केली आणि मराठीत लक्षणीय ठराव्यात अशा कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. ‘गावठाण’ (२००५), ‘रौंदाळा’ (२००८), ‘झड-झिंबड’ (२०१२), ‘धूळमाती’ (२०१४), ‘रिंगाण’ (२०१८) या त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या असून, या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. याशिवाय ‘नांगरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत. गावसंस्कृती आणि बदलते खेड्यातील जीवनसंघर्ष त्यांच्या लिखाणाचा विषय आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी नावाजले गेले आहे. यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्कार, वि. स. खांडेकर पुरस्कार, बाबुराव बागुल शब्द पुरस्कार, भैरूरतन दमानी साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

रिंगाण या कादंबरी विषयी

‘रिंगाण’ या कादंबरीला मराठी भाषा करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 साठी आज श्री खोत यांना पुरस्कार प्रधान झाला. ‘रिंगाण’ ही एक थक्क करणारी कादंबरी आहे. जिच्यात जंगलात राहणाऱ्या समुदायाच्या विस्थापित आयुष्याचे चित्रण आहे आणि या समुदायाला धरण बांधण्याच्या कामासाठी एका प्रतिकूल समुदायामध्ये पुनर्स्थापित करण्यात आलेले आहे. मानव आणि निसर्गातील नातेसंबंधांच्या इतिहासाचे हे निवेदन असून, स्वरक्षणासाठी मानवाने निसर्गाशी केलेल्या संघर्षाचा हा वास्तववादी इतिहास आहे. या कादंबरीतील नायक, देवप्पाचा वेदनादायी शोध मानवाच्या निसर्गाशी असलेल्या नात्यातील दृढता आणि संघर्ष रेखाटतो. मानवाच्या उद्धटपणामुळे आणि ताकदीमुळे कशी पर्यावरणीय आणि सामाजिक हानी झालेली आहे याचे अत्यंत महत्वपूर्ण विधान या कादंबरीत करण्यात आलेले आहे. भारतीय कादंबरी प्रकाराला मराठीतील ‘रिंगाण’ हे महत्वपूर्ण योगदान आहे. माणूस आणि पाळीव प्राणी यांच्यातील संबंधांचा एक अनोखा अनुबंध या कादंबरीतून अनुभवायला मिळतो.

कोंकणी भाषेतील ‘वर्सल’या लघुकथा संग्रहासाठी प्रकाश एस पर्येंकर यांना पुरस्कार

प्रख्यात कोंकणी लेखक, कवी, अनुवादक तथा पटकथा लेखक, प्रकाश एस पर्येंकर यांना ‘वर्सल’ या लघुकथा संग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

७० वर्षे पूर्ण झाल्याने साहित्य अकादमीकडून ११-१६ मार्च दरम्यान साहित्य महोत्सव आयोजित      

नॅशनल अकादमी ऑफ लेटर्स, इंडिया या साहित्य अकादमीला यावर्षी ७० वर्षे पूर्ण होत असल्याने, सहा दिवसांचा भव्य सोहळा अकादमीकडून आयोजित करण्यात आला आहे. अकादमीतर्फे दरवर्षी साजरा केला जाणारा ‘साहित्योत्सव’ या वेळी जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी माहिती दिली की, 190 हून अधिक सत्रांमध्ये 1100 हून अधिक नामवंत लेखक आणि अभ्यासक सहभागी होत असून, देशातील 175 हून अधिक भाषांचेही त्यात प्रतिनिधित्व केले गेले आहे.

प्रसिद्ध उर्दू लेखक आणि गीतकार गुलजार यांचे प्रतिष्ठित संवत्सर व्याख्यान 13 मार्च रोजी मेघदूत खुले नाट्यगृहात सायंकाळी 6.30 वाजता होणार.

11 मार्च रोजी साहित्य अकादमी फेलोचाही सत्कार करण्यात आले. बहुभाषिक काव्यवाचन आणि लघुकथा वाचन, युवा साहित्य, अस्मिता, पूर्वोत्तरी, भारतातील भक्ति साहित्य, भारतातील बालसाहित्य, भारताची कल्पना, मातृभाषेचे महत्त्व, आदिवासी कवी आणि लेखक संमेलन या विषयावर पॅनेल चर्चा, या नियमित कार्यक्रमां व्यतिरिक्त, भविष्यातील कादंबरी, सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणून रंगभूमी, भारताचा सांस्कृतिक वारसा, भारतीय भाषांमधील विज्ञान कथा, नीतिशास्त्र आणि साहित्य, भारतीय भाषांमधील चरित्रे, साहित्य आणि सामाजिक चळवळी, परदेशातील भारतीय साहित्य अशा विविध विषयांवर पॅनेल चर्चा आणि परिसंवादही होतील. या सहा दिवसीय महोत्सवात सहभागी होणारे हिंदी आणि विविध भारतीय भाषांमधील काही नामवंत लेखक आणि अभ्यासक असतील- एस.एल. भायराप्पा, चंद्रशेखर कंबार, पॉल जकारिया, आबिद सुर्ती, के. सच्चिदानंदन, चित्रा मुदगल, मृदुला गर्ग, के. एनोक, ममंग दाई, एच.एस. शिवप्रकाश, सचिन केतकर, नमिता गोखले, कुल सैकिया, वाय.डी. थोंगची, मालश्री लाल, कपिल कपूर, अरुंधती सुब्रमण्यम, रक्षंदा जलील, राणा नायर, वर्षा दास, सुधा शेषयान, उदय नारायण सिंग, अरुण खोपकर, शीन काफ निजाम आदी सहभागी होतील.

तीन राज्यांचे राज्यपाल – आरिफ मोहम्मद खान (केरळ), श्री विश्वभूषण हरिचंदन (छत्तीसगड), आणि श्री सी.व्ही. आनंद बोस (पश्चिम बंगाल) हे देखील महोत्सवात सहभागी होण्याबाबतची माहिती अकादमी सचिवांनी दिली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *