भिवंडीतील प्रभाग समिती परिसरात वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी  स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असून येथील नागरिकांनी मतदान करावे यासाठी याठिकाणी आज वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

स्वीप उपक्रमांतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवाने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या प्रत्येकाचे मत आवश्यक असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. आपले मत अमूल्य आहे, ते वाया घालवू नका असा संदेश नागरिकांना वासुदेवाने दिला.

यावेळी मतदानाबाबत जनजागृतीपर संदेश देणारे फलक घेवून जनजागृती करण्यात आली. वासुदेवाला पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी आम्ही मतदान करणार.. अशा घोषणा दिल्या. 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवा, आपणही मतदान करा आणि  आपल्या आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन करण्यात आले.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *