फिलिपाईन्समधील भारतीय समाजाचे सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान – मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. १९:  मराठी समाज जगभर पसरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने मर्यादित असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले.

मंत्री रावल यांनी मनिला येथे आयोजित विशेष कार्यक्रमात भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. या कार्यक्रमात प्रवासी मराठी समाजाशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रवासी मराठी समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या 12 कलमी उपक्रमांची घोषणा केली. त्यामध्ये जागतिक महाराष्ट्र मंडळांचा डेटाबेस तयार करणे, अधिकृत ई-मेल प्रणालीद्वारे संपर्क, डिजिटल माध्यमातून जागतिक महाराष्ट्र दिन साजरा करणे, जागतिक प्रवासी महाराष्ट्र मंडळ स्थापन करणे, स्वतंत्र लोगो व संकेतस्थळ विकसित करणे, डिजिटल नोंदणी पोर्टल सुरू करणे, आभासी संवाद सत्रे आयोजित करणे, गुंतवणूक, विद्यार्थी व सांस्कृतिक विषयांसाठी सिंगल विंडो प्रणाली, एमआयडीसी समन्वय यंत्रणा, तक्रार निवारण यंत्रणा, परराष्ट्र मंत्रालय व भारतीय दूतावासांच्या सहकार्याने विद्यार्थी उपक्रम आणि प्रभावी घोषवाक्य तयार करणे यांचा समावेश आहे.

यावेळी मंत्री रावल यांनी महाराष्ट्र आणि जागतिक मराठी समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्याची गरज व्यक्त केली.

मंत्री रावल म्हणाले की, मनिला, सेबू आणि दावाओ या शहरांमध्ये भारतीय वंशाचे नागरिक आयटी, बीपीओ, आरोग्य व वित्तीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महाराष्ट्रीयन समाजानेही आयटी, औषधनिर्मिती, सल्लागार सेवा आणि उद्योजकता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत-फिलिपाईन्स संबंध अधिक बळकट होत असून माहिती तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, संरक्षण सहकार्य आणि प्रक्रिया उद्योग या क्षेत्रांत मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्र हे औद्योगिक व वित्तीयदृष्ट्या अग्रगण्य राज्य असून फिलिपाईन्सला आसियान प्रदेशाचे प्रवेशद्वार मानून सहकार्य वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

नागपूरचे मूळ रहिवासी नरेंद्र सिंगरू व रमोलाआईक सिंगरू यांनी त्यांच्या निवासस्थानी मंत्री रावल यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर मनिलातील मराठी बांधवांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी भारताचे मनिलातील राजदूत हर्ष कुमार जैन, प्रथम सचिव निलेश कुमार राय उपस्थित होते. आशियाई विकास बँकेचे अधिकारी एल. सत्यश्रीनिवास, अर्जुन सिंह, क्रिशन रोतेला तसेच राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. कार्यक्रमास मनिलातील मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन प्रवासी मराठी समाजाला राज्याच्या विकासातील महत्त्वाचा भागीदार मानत असून व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंत्री रावल यांनी केले. तसेच त्यांनी उपस्थितांना आणि मनिलातील सर्व मराठी बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

०००

बी. सी. झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *