विधानसभा कामकाज

विधानभवनात उद्या महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्र – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

डॉ.सौम्या स्वामिनाथन आणि डॉ. नित्या राव यांचे व्याख्यान
शेतकरी महिलांचा यांचा होणार सत्कार

मुंबई, दि.१० : संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केलेले आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने बुधवार, दिनांक ११ मार्च, २०२६ रोजी विधानभवन, मुंबई येथे सकाळी १०.०० वाजता महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांनी या प्रसंगी उपस्थित रहावे, असे निवेदन विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केले.

तसेच या चर्चासत्राबाबत विधानपरिषदेत सभापती प्रा.राम शिंदे यांनी निवेदन केले.

संयुक्त राष्ट्र संघटनेने यंदाचे वर्ष हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. जागतिक अन्न व्यवस्थेत महिलांचे अमूल्य योगदान अधोरेखित करणे आणि शेतीमध्ये त्यांना समान संधी, संसाधने, जमीन अधिकार मिळवून देऊन सशक्त करणे, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जाणे अभिप्रेत आहे. या पार्श्वभूमीवर या विशेष कार्यक्रमाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. सौम्या स्वामिनाथन आणि डॉ. नित्या राव यांचे महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासंदर्भात व्याख्यान होईल. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शेतकरी महिलांना यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या समिती प्रमुख मोनिका राजळे, वि.स.स. डॉ. ज्योती गायकवाड, वि.स.स. मंजुळा गावित, मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ जितेंद्र भोळे उपस्थित असणार आहेत.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *