मुंबई दि. २२ : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले आहे. २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले.
दोन दिवसीय ग्रंथोत्सवात २२ फेब्रुवारी रोजी ग्रंथ दिंडी, अभिवाचन दृकश्राव्य कार्यक्रम, लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर २३ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, ग्रंथ भेट वितरण व व्याख्यान, वसा वाचन संस्कृतीचा या विषयावर परिसंवाद, कुटुंब रंगले काव्यात हे एकपात्री काव्य नाट्य अनुभव, हास्य संजीवनी अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद विद्यार्थी व साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.
०००