वेंगुर्ला बंदर विकासासाठी जेट्टी, संलग्न सुविधांच्या बांधकामाची प्रक्रिया तातडीने करावी – बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. 15 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला बंदर विकासासाठी जेट्टी आणि संलग्न सुविधांचे बांधकाम सुरु करण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

वेंगुर्ला बंदराचा विकास आणि शिरोडा मासळी केंद्राच्या विकासाकरिता शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, बंदरे विकास विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून महाराष्ट्र शासनाकडून घोषित झाला आहे. जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवबाग, तारकर्ली या पर्यटनाच्या ठिकाणी दरवर्षी 15 लक्ष पर्यटक भेट देत असतात. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत वेंगुर्ला बंदर येथे पाईल जेट्टी व त्याअनुषंगाने पायाभूत सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे. त्या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीस मोठी मदत होणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत, असे मंत्री श्री बनसोडे यांनी सांगितले.

वेंगुर्ला बंदर येथे 1963 मध्ये पाईल जेट्टी बांधण्यात आली. परंतु, कालानुरुप जेट्टीची प्रचंड झीज झाली नवीन जेट्टी बांधणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तांत्रिक मान्यतेसह सर्व प्रकारच्या मान्यता लवकरात लवकर मिळवून बांधकामाला सुरुवात करण्यात यावी, असेही मंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी शिरोडा येथील मासळी उतरविण्याच्या केंद्राचे काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *