मुंबई उपनगरातील संभाव्य धोकादायक दरडप्रवण भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. २३ : मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखालील संभाव्य दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या वस्त्यांच्या संरक्षणासाठी तातडीची उपाययोजना म्हणून संरक्षक भिंती बांधण्याची आवश्यकता आहे. अशा धोकादायक परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंती बांधण्याची कार्यवाही मुंबई महानगरपालिकेने तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होताच त्या खर्चाची प्रतिपुर्ती मुंबई महानगरपालिकेला करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाला दिल्या.

मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप व अन्य  ठिकाणी टेकडीखाली असलेल्या वस्तींच्या संक्षणासाठी करावयाच्या उपाय-योजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, वित्त विभागाच्या सचिव (वित्तीय सुधारणा) श्रीमती शैला ए., आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, भांडूप आदी भागात टेकडीखाली दरडी कोसळण्याचा धोका असणाऱ्या अनेक वस्त्या आहेत. अशा धोकादायक ठिकाणी अनेक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा धोकादायक ठिकाणी दुर्घटना घडू नये, जीवित व वित्त हानी होऊ नये, यासाठी प्राधान्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने या भागात संरक्षकभिंती बांधण्यासह इतर आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. मुंबई उपनगरातील अशा धोकादायक ठिकाणांचे सर्व्हेक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने आयआयटी-मुंबई मार्फत केले असून त्याची यादी तयार करण्यात आली आहे. अशा संभाव्य धोकादायक भागात मुंबई महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना राबवाव्यात. आपत्ती निवारणासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळताच मुंबई महानगर पालिकेला खर्चाची प्रतिपुर्ती करण्यात येईल. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून ही प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *