मोठ्या प्रमाणात रोजगार देणाऱ्या क्षेत्राकडे सजगतेने बघण्यासाठी

१६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित केलेल्या ‘महाखादी कला- सृष्टी प्रदर्शन २०२४’ निमित्ताने  खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांचा हा माहिती देणारा लेख…

खादी हे आपले महावस्त्र आहे. ज्याने स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाला एकत्र बांधले  आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वदेशीचा स्वाभिमान जागवण्याचे काम केले. या एका धाग्याने संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे काम केले होते. खादीच्या धाग्यात एक शक्ती आहे. त्यामुळेच सर्व विभागांना एकत्र करुन खादीच्या कपड्यांचे महत्व आणि इतरही आपली सुंदर वस्त्र परंपरा आहेत याचे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. आजकाल नागरिक मॉलमध्ये जाऊन खरेदी करतात. तिथे मोठमोठ्या जाहिराती केलेल्या असतात. ५० टक्के सूट, एकावर एक मोफत असे विविध पद्धतीने ग्राहकांना आकर्षित केले जाते. कोणीही कोणतीही वस्तू अशी मोफत देत नाही. त्याची छुपी किंमत कशात तरी दडलेली असते. पण जाहिराती पाहून आपण आकृष्ट होतो.

आमचा विभाग लघु उद्योजकांसाठी काम करतो. माझ्या विभागासोबत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, एक जिल्हा एक उत्पादन , उद्योग संचालनालय, भारतीय लघु उद्योग विकास बॅंक, जी लघु उद्योजकांना कर्ज देते आदिवासी विकास विभाग आणि खादी व ग्रामोद्योग आयोग या सर्वांच्या सहकार्याने १६ ते २५ फेब्रुवारी  २०२४ दरम्यान वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एम एम आर डीए च्या मैदानावर ‘महाखादी कला- सृष्टी २०२४’ एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ खादीला प्रोत्साहन देतेच पण खादी ग्रामोद्योग आयोग सुद्धा लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत असते.  आमचा उद्देशच लघु उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा आहे.

मोठ्या उद्योजकांना, त्यांच्या वस्तूंना सहज बाजारपेठ उपलब्ध होते. ते सहज ऑनलाइन मार्केटमध्ये सुद्धा समाविष्ट होतात.  लघु उद्योजकांना मात्र हे सहज शक्य होत नाही. टेक्नोसॅव्ही म्हणजे ऑनलाईन विक्री प्रक्रिया वस्तुचे विशिष्ट प्रकारचा फोटो, विशिष्ट प्रकारचे पॅकिंग, मार्केटपर्यंत पोहचण्यासाठी बरेच प्रयत्न करायला लागतात. त्यामुळे लघु उद्योजकांना बाजारपेठ  मिळवुन देणे फार महत्वाचे आहे. लघु उद्योजकांनी निर्माण केलेल्या फार अप्रतिम वस्तु आपल्याकडे आहेत ज्याला खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत आपण पोहचवले पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपण लोकांना दिले तर त्यांचा उद्योग वाढीस लागू शकतो.

कारागिरांना हातमागावरील एक वस्त्र तयार करायला अतिशय  परिश्रम लागतात. खादी किंवा पैठणीला तयार करायला दीड ते तीन महिने लागतात. जीव ओतून तयार केलेल्या या वस्त्राची किंमत त्यामुळेच जास्त असते. मात्र त्याकडे आपण त्या आत्मियतेने व सजगतेने पाहिले पाहिजे.

लघु उद्योजकांना बाजारपेठ  उपलब्ध करुन देण्याची गरज आहे, म्हणून महाखादी कलासृष्टी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. तसेच ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही उद्योग संचालनालयाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ज्यात प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने आहेत.  जसे छत्रपती संभाजीनगर मधील पैठणी, हिमरू शॉल,पालघरची वारली, नागपूरची संत्री, कोल्हापूरचा गुळ, चप्पल, लासलगावचे कांदे, कोकणाचे काजू, नाशिकचे द्राक्षे, महाबळेश्वरचे मध आहे, अशी वैविध्यपूर्ण वस्तूंनी सजलेली वैशिष्ट्यपूर्ण बास्केट महाखादी कलासृष्टी प्रदर्शनामध्ये असणार आहे. सुंदर अशा कपड्यांसोबतच हस्तकलेच्या वस्तू व खाद्यपदार्थ आहेत.

आपल्याजवळ एकतरी पैठणी असावी असे आपल्या महाराष्ट्रातील स्त्रीचे स्वप्न असते. साधीसुधी नाही तर भरजरी पैठणी असावी असे तिला वाटते. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या उद्योजकांच्या पैठणी या इतर पैठणीपेक्षा खुप वेगळ्या असतात. खरेतर पैठणी ही पैठणची आहे. पैठणच्या पैठणीची वीण, काठपदर, त्यावरील बुटी हे सगळेच वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रदर्शनात अशा सुंदर पैठणी उपलब्ध असतील.

या एक्स्पोमध्ये एक प्रात्यक्षिक व अनुभव  दालन असणार आहे. ज्यात आपल्याला पैठणीचा इतिहास, तिचे विणकाम, मध कसे तयार होते, खादी कशी तयार करतात, चरख्यावरील सूतकताई, हातमागावर कापड तयार करणे, बांबूपासून तयार होणा-या वस्तू, लाखाच्या बांगड्या अशा अनेक वस्तूंचे प्रात्यक्षिकासह अनुभव नागरिकांना येथे घेता येईल. संध्याकाळी फॅशन शो, काही मनोरंजनात्मक  कार्यक्रम, काही परिषदा आहेत ज्यात फॅशन इंडस्ट्री आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीची वाढ आणि विकास यात दिग्गजांचे अनुभव आणि चर्चा ऐकता येईल.

प्रदर्शन बघताना खूप वेळ खरेदी केल्यानंतर भुक शमविण्यासाठी बचत गटाच्या महिलांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल असतील यात महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. जसे मांडे, तांबडा पांढरा रस्सा, पुरणपोळी, बटाटावडा, कोकणीपदार्थ, वैदर्भिय पदार्थ आणि त्या- त्या भागातील विविध स्वादिष्ट व रुचकर खाद्य पदार्थांची मेजवानी नागरिकांना तब्बल १६ ते २५ फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे.

या महोत्सवात केवळ खरेदी किंवा खाद्यपदार्थच नाही तर, या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांचा  एक दृष्टिकोन तयार होईल. लघु उद्योजकांचे महत्व आणि आपल्या अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान मोठे आहे. कृषी  व्यवसायानंतर अर्थव्यवस्थेच्या १७% योगदान देणारे लघुउद्योग हे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. याकडे नागरिकांनी सजगतेने पहावे म्हणून हे प्रदर्शन आहे. याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा एवढेच नागरिकांना मन: पूर्वक आवाहन करते.

0000

आर. विमला

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *