मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई, दि. ३ : कोकणासाठी अत्यंत महत्वाचा असलेला मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिल्या.

मंत्री श्री. गडकरी यांनी आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीष म्हैसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय जयस्वाल, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डी, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता संतोष शेलार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, मुंबई- गोवा महामार्गाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे. त्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही महसूल विभागाने तातडीने पूर्ण करावी. भूसंपादनाचे प्रस्ताव आगामी १५ दिवसांत निकाली काढावेत. महामार्गाच्या कामाचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले की, मुंबई- गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. श्री. जयस्वाल यांनी महामार्गाच्या कामाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

 

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *