सिन्नर शहरातील पाणीपुरवठा व मुलभूत सुविधांची कामे तत्काळ मार्गी लावावीत – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि.10  (जिमाका वृत्तसेवा):सिन्नर शहरात सुरळीत पाणीपुरवठा व नागरिकांच्या मुलभूत सेवा सुविधांची कामे तत्काळ मार्गी लावावीत, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकटे यांनी दिल्या.

आज सिन्नर येथील नगर परिषद कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आजोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता नीलेश चालिकवार, नायब तहसीलदार सागर मुंदडा, सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी,  उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. कोकाटे यावेळी म्हणाले की, ज्या ठिकाणी जलकुंभ जीर्ण झाले आहेत त्यांचे त्वरित निर्लेखन करण्यात यावे व त्या ठिकाणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जास्त पाणी क्षमतेच्या नवीन  पाणी साठवण टाक्या बसविण्यात याव्यात. ज्या ठिकाणी पाणीगळती होत आहे तेथे ताबडतोब दुरुस्ती करावी. नवीन पाईपलाईन वा पाणी साठवण टाक्यांसाठी नगरपरिषदेने सुधारित अंदाजपत्रक शासनाला सादर करावे.  पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी आवश्यतेनुसार अधिक क्षमतेचे वीज रोहित्र बसविण्यात यावे. नगरपरिषदेने पाणी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला वेळेत अदा करावे. पाणीपुरवठा संबंधीची देयके  तृतीय पक्ष लेखापरीक्षण झाल्याशिवाय अदा करू नयेत, असे निर्देश कृषिमंत्री ॲड.कोकाटे यांनी दिले.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर स्वचछतेसाठी आधिक प्राधान्य द्यावे. नागरिकांना नवीन दरानुसार घरपट्टी भरण्याच्या दृष्टीने जनजागृती करावी. थकीत घरपट्टी तडजोडीसाठी लोकन्यायालयात अर्ज दाखल करण्यात यावा.  25 जानेवारीला याबाबत पुन्हा आढावा बैठक घेण्यात यावी, अशा सूचनाही कृषिमंत्री श्री.कोकाटे यांनी दिल्या.

The post सिन्नर शहरातील पाणीपुरवठा व मुलभूत सुविधांची कामे तत्काळ मार्गी लावावीत – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *