धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात २ हजार गाईंचे वितरण करणार; आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी ! – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 13: (जिमाका वृत्त) आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी या दोनही तालुक्यांसाठी सुमारे सव्वा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

ते धडगाव तालुक्यात बचत गटांना शेळी वाटप, महिला गृहिणींना गॅस कनेक्शन वितरण व वनपट्टेधारकांना लाभाच्या योजनांचे वितरण करताना बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी नतिशा माथूर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी उत्तम राऊत, देवेंद्र वळवी व पंचक्रोशीतील स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गावित म्हणाले, आदिवासी भागातील सर्व रस्ते जून अखेरपर्यंत पूर्णत्वास येतील. या रस्त्यांच्या माध्यमातून शाळा, रूग्णालये, तालुका मुख्यालये, अंगणवाड्या, आश्रमशाळा थेट रस्त्यांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे दळण-वळण व त्या भागातील उद्योग व्यवसायांच्या भरभराटीसही चालना मिळणार आहे. त्यात दुधाळ गाईंचे वाटप केल्याने दुग्ध व्यवसाय भरभराटीस येणार आहे. तसेच वनपट्टेधारतांना शेळ्यांचेही वितरण केले जाणार आहे. धडगाव अक्कलकुवा तालुक्यात आमचूरवर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ३ हजार महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील निधीचेही वितरण करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पना मार्गदर्शनाखाली आदिवासी, दुर्गम भागातील महिलांचे चुलीच्या धुरापासून बिघडणारे आरोग्य  लक्षात घेवून उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांच्या आरोग्य जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. येणाऱ्या काळात आदिवासी दुर्गम भागातील महिलांचे आरोग्य व जीवनमान उंचावण्यासाठी वेगवेगळ्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत.

या कार्यक्रमात ४२ गटांना शेळी गट प्रमाणपत्र, ८८१ महिलांना गॅस कनेक्शन तर १०३ वनपट्टेधारकांना प्रत्येकी १० शेळी, बोकड वितरण करण्यात आले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *