राज्यात ज्यूदो खेळाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. २:  ज्या जिल्ह्यांमध्ये ज्यूदो खेळासाठी उच्चप्रतीच्या मॅट्स व जागा उपलब्ध नाहीत तिथे या सुविधा राज्य शासनाकडून पुरविण्यात येतील. तसेच, या क्रीडा प्रकाराच्या विकासासाठी येत्या २५ वर्षांचा रोडमॅप तयार करावा, यास राज्य शासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशन आणि नागपूर ज्यूदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुवर्ण महोत्सवी राज्य ज्यूदो स्पर्धेचे श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.धनंजय भोसले, महासचिव शैलश टिळक, राज्य क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, बालन गृपचे प्रमुख पुनीत बालन आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, बुध्दी व शरीरिक बळाचा चफकल प्रयोग करून खेळला जाणारा ज्यूदो क्रीडा प्रकार व्यक्तीमत्व विकासातही मोलाचा ठरतो. भय हे मनुष्याच्या व्यक्तीमत्व विकासातील अडसर निर्माण करते तर ज्यूदोमुळे हा अडसर दूर होतो. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील प्रशिक्षक रघुनाथ खांदेवाले यांनी हा खेळ महाराष्ट्रात रुजवला ही अभिमानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपूर येथील मानकापूर क्रीडा संकुल अत्याधुनिक व उत्तम दर्जाच्या सुविधायुक्त बनविण्यासाठी राज्य शासन ७०० कोटींचा निधी उपलब्ध करुन देत आहे. येथे ज्यूदोसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठात रुपांतरीत करण्यात येत आहे. नुकत्याच पार  पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम आला याचा अभिमान असल्याचे सांगत ऑलिम्पिकसह विविध महत्वाच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूना शासनाच्यावतीने प्रोत्साहनपर राशी देण्यात येते व नोकरीतही सामावून घेण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात १० ज्यूदोपटूनी विविध प्रात्यक्षिक सादर केली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते सामनाधिकारी आणि प्रमुख पंच यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्याच्या ३२ जिल्ह्यांतून आणि क्रीडा प्रबोधिनी येथून एकूण ११०० ज्यूदोपटू सहभागी झाले आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *