कायदा, सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत  

रायगड दि. १२ (जिमाका):  अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये अलिबाग शहरात असल्याने जिल्ह्यातील नागरिक शासकीय कामानिमित्त मोठ्या संख्याने अलिबाग शहरात येत असतात. तसेच अलिबाग शहर हे प्रसिद्ध पर्यटन केंद्र असल्याने शहरास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे अलिबाग शहरात तसेच शेजारील गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा महत्त्वाची असल्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

अलिबाग शहरात कायदा, सुव्यवस्था व सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा उभारणे कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री श्री.सामंत यांच्याहस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रशासक तथा अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, या यंत्रणेमुळे पोलिसांना काही गोष्टी शोधण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षितेसाठी ही यंत्रणा महत्त्वाची आहे. अलिबागच्या सीसीटीव्ही सर्व्हीलेन्स यंत्रणेचे लोकार्पण झाले असून महाड व रोहा शहरात ही यंत्रणा उभारणीसाठीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व शहरामध्ये अशा पध्दतीची यंत्रणा उभारण्यासाठी नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

तसेच अलिबाग पोलीस ठाणे येथे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. या कंट्रोल रूममध्ये एकाच वेळी 64 कॅमेराचे फुटेज पाहता येईल इतक्या मोठ्या आकाराची UHD स्क्रीन बसविण्यात आली आहे. या कंट्रोल रूम मध्ये ANPR व FR साठी आवश्यक यंत्रणा बसविण्यात आली असून या सॉफ्टवेअरमुळे अलिबाग शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची माहिती गोळा करता येणार आहे. तसेच FR प्रणालीमुळे संशयित गुन्हेगारांस शोधण्यास पोलीस दलास मदत होणार आहे. हा प्रकल्प  शहरातील पोलिस विभाग व वाहतूक पोलीस विभागाच्या कामकाजासाठी उपयुक्त होणार असून शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे पोलीस दलास सुलभ होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी पोलीस बँड पथकाने सलामी दिल्यानंतर लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *