उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अंजनगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती, दि. ११: मौजे अंजनगाव (कऱ्हावागज) येथे ‘महावितरण’च्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राचे तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, सरपंच प्रतिभा परकाळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, अंजनगाव (कऱ्हावागज) उपकेंद्र होण्यापूर्वी या परिसरातील गावे व शेतीपंपांना बारामती शहरातील १३२/२२ केव्ही अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जात होता. परंतु या वीज वाहिनीची लांबी जास्त असल्यामुळे वीजपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होत असे. यामुळे २०२२ मध्ये कृषी आकस्मिक निधीतून मंजूर ७ कोटी ८५ लाख रुपयांतून अंजनगाव येथे ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रांची उभारणी झाली. या नवीन उपकेंद्रामध्ये ५ एमव्हीए क्षमतेचे २ अतिउच्चदाब रोहित्र आहेत. या उपकेंद्रामुळे अंजनगाव पंचक्रोशीतील सुमारे तीन हजार वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने व सुरळीत वीजपुरवठा मिळणार आहे.

या उपकेंद्रावर शेतीपंपाचे १ हजार ६०० तर गावठाणचे १ हजार ३०० वीजग्राहक येतात. या उपकेंद्रातून अंजनगाव व कऱ्हावागज अशा दोन गावठाण वाहिन्या तर अंजनगाव व कऱ्हावागज दोन शेती वाहिन्या निघतात. ज्या पुढे जाऊन अंजनगाव, रानमळा, कुचेकरवस्ती, कऱ्हावागज शिवार, बनकरवस्ती, नेपतवळण, तांदळेवस्ती, नाळेवस्ती, खोमणेवस्ती, लष्करवस्ती या भागातील शेती व बिगरशेती ग्राहकांना पुरेशा दाबाने व अखंडित वीजपुरवठा करणार आहेत, असेही श्री. पवार म्हणाले.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे शौर्य आणि पराक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध  सशस्त्र लढा देत देशवासियांना स्वातंत्र्याचे स्वप्न, बळ आणि विश्वास दिला. त्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली.

राजे उमाजी नाईक यांचे शौर्य आणि पराक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. त्यांचे स्थान देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आणि देशवासियांच्या हृदयात कायम राहणार आहे. अशा आपल्या देशाच्या थोर सुपुत्राचे आपण कृतज्ञतापूर्वक स्मरण केले पाहिजे, असे प्रतिपादन श्री. पवार यांनी केले.

The post उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अंजनगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *