विधानपरिषद कामकाज

नागपूर विभागातील शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नागपूर, दि. १४ : नागपूर विभागातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले, नागपूर विभागातील शिक्षकांच्या  प्रसिद्ध केलेल्या सेवा ज्येष्ठता यादीवर येणाऱ्या आक्षेपांचे निराकरण करून एक महिन्याच्याआत यावर निर्णय घेतले जातील. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अडचणी असतील त्या देखील सोडवल्या जातील, असेही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

नागपूर, दि. १४ – ध्वनी प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम होत असून पर्यावरण विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत यावर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी डीजेच्या आवाजावर नियंत्रण आणण्याबाबत नियम ९७ अन्वये अल्पकालीन सूचना उपस्थित केली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने मानके ठरविण्यात आली आहेत. निवासी आणि शांतता क्षेत्रामध्ये रात्रीच्या आवाजावर विशेष बंधने आहेत. याच्या उल्लंघनाबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीस प्रशासनामार्फत तत्काळ कारवाई करण्यात येते. प्रदूषण रोखण्याबाबत जिल्हा पातळीवर समिती असून या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल. तथापि, शासन आणि प्रशासनामार्फत केलेल्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याशिवाय यश येत नसल्याने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सोलापूर जिल्ह्यात डीजेच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने राज्यात सर्वत्र ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार – इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

नागपूर, दि १४ :- लिंगायत समाजातील खुल्या वर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये विधानपरिषदेत या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. सावे यांनी सांगितले, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळामार्फत लिंगायत समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. लिंगायत समाजातील काही उपजाती इतर मागासवर्ग प्रवर्गात तर काही उपजाती विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट आहेत. त्यामुळे या व्यतिरिक्त लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपकंपनी स्थापन करण्याऐवजी स्वतंत्र महामंडळ स्थापनेबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मंत्री श्री. सावे यांनी अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

केंद्र सरकारच्या कायद्यानुसार मॅट्रीमोनीयल वेबसाईट्सना शासनाला माहिती देणे बंधनकारक – गृह राज्यमंत्री योगेश कदम

नागपूर, दि. १४ – केंद्र सरकारच्या सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या कायद्यामध्ये २०२१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यातील नियम ३(१) नुसार आवश्यकता भासल्यास मॅट्रीमोनीयल वेबसाईट्सना त्यांच्याकडील माहिती शासनाला उपलब्ध करुन देणे बंधनकारक असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य श्रीमती चित्रा वाघ यांनी मॅट्रीमोनीयल वेब साईट्सना कायद्याच्या कक्षेत आणण्याबाबत नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्र सरकारचा कायदा आहे. या कायद्यामध्ये मॅट्रीमोनीयल वेबसाईट्स, ॲप यांच्यासाठी वेगळे बंधन असावे, याबाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येईल.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *