तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांची कामे महिनाभरात पूर्ण करावीत – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 8 : सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करावीत. या योजनांची कामे पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ देता येईल. सिंचन क्षेत्रात वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, त्यासाठी तारळी प्रकल्पातील उपसा सिंचनाची कामे महिनाभरात पूर्ण करावीत, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात दालनामध्ये तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजना, मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील डावा व उजवा कालवा याबाबत  बैठकीचे आयोजन करण्यात आले.  बैठकीला सातारा जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धनवटे, तांत्रिक विभागाचे श्री. पाटील आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ, अधीक्षक अभियंता जयंत शिंदे  सहभागी झाले होते.

तारळी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 50 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेत मंत्री श्री. देसाई म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील पाल, इंदोली, तारळे, बांबवडे, कोंजवडे, धूमकवाडी व अंबर्डे या उपसा सिंचन योजनांपैकी अपूर्ण योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. तसेच दुसऱ्या टप्प्यात 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनांची कामेही पूर्ण करावीत. उपसा सिंचन योजनांमधील कामांचे गळती शिवाय  प्रात्याक्षिक घेण्यात यावे. हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून  100 टक्के प्रात्याक्षिक घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. कुठल्याही परिस्थितीत पहिला टप्प्यातील कामे युद्धपाळीवर पूर्ण करावीत, असे आदेशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

मोरणा (गोरेघर) योजनेतील उघड्यावरील कालव्यांचे भू-भाडे देण्यात यावे. तसेच जमिनी पूर्ववत करून देण्यात याव्यात. डावा कालवा 1 ते 10 किलोमीटरचा असून बंदिस्त पाइपलाइनचा प्रस्ताव तयार करावा. उजवा कालवा 1 ते 27 किलोमीटर असून येथेही बंदिस्त पाइपलाइनद्वारे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यात यावे. याबाबतही कारवाई करण्यात यावी. योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *