कुरुकलीतील भूखंड संबंधित जागामालकांच्या नावे करा – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.८ (जिमाका): कागल तालुक्यातील कुरुकली येथील ७७ नागरिकांच्या नावे भूखंड करण्याची प्रक्रिया गतीने राबवा. तसेच कागदपत्रे उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांबाबतही शासन स्तरावर लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

कुरुकली येथील भूखंडधारकांबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, विकास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

कुरुकली येथील बेघर 77 नागरिकांना घर बांधण्यासाठी शासनाकडून सन 1989 मध्ये भूखंड देण्यात आला आहे. कागदपत्रे उपलब्ध असणाऱ्या जागा मालकांच्या नावे संबंधित भूखंड करुन देण्याची कार्यवाही गतीने करा. कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या नागरिकांबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केली.

येथील पूरग्रस्त नागरिकांनी भूखंड मिळण्याबाबत आवाहन केले असता उर्वरित 16 पूरग्रस्तांनाही भूखंड वाटप करण्याची कार्यवाही करा, अशी सूचना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केली.

बेघर नागरिकांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाकडे लवकरात लवकर सकारात्मक प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

गडहिंग्लज क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागा जिल्हा परिषदेच्या नावे करा

गडहिंग्लज क्रीडा संकुलासाठी आरक्षित असणारी जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर आदी उपस्थित होते.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *