जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत          

रायगड(जिमाका)दि.7:- खेळ हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहेखेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते. खिलाडू वृत्ती जोपसल्यास कुठल्याही संकटाचा सामना करता येतो, जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची असल्याचे  प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे आयोजित रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवाच्या समारोप व  बक्षीस वितरण कार्यक्रम  प्रसंगी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार भरत गोगावले, कुलगुरु प्रा.डॉ.कारभारी काळे, कुलसचिव अरविंद किवळेकर, छत्रपती पुरस्कार प्राप्त सुप्रिया गाढवे, क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड, डॉ.अतुल लोंढे,आदि उपस्थित होते.

या रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य आणि नैपुण्य प्राप्त सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करुन पालकमंत्री  सामंत म्हणाले की,  आपले शरीर ही आपली संपत्ती आहे. क्रीडा महोत्सव हे केवळ बक्षिस मिळविण्यासाठी नसून या माध्यमातून आपले शरीर आणि मन बळकट होत असते. प्रत्येकाने आपले आरोग्य टिकविण्यासाठी खेळाचा आपल्या जीवनात समावेश करणे आवश्यक आहे.  खेळामुळे सकारात्मक वृत्तीबरोबरच नम्रता येते. खिळाडूवृत्तीमुळे पराभव पचविण्याची ताकद सर्वांमध्ये वाढीस लागते. यामुळे माणूस जीवनात कधीही पराजित होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारुन स्वत:चे निरोगी आयुष्य घडवावे असेही पालकमंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी प्रतिस्पर्धी आवश्यक असतो. प्रतिस्पर्ध्याला दाद देण्याची कौतुक करण्यची खिलाडू वृत्ती आपल्यामध्ये आहे कारण ही आपल्या राज्याची संस्कृती आहे. महाराष्ट्राला खेळ आणि खेळाडूंची परंपरा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी भविष्यात सकारात्मकता अंगी बाळगून स्वत:ची प्रगती करावी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सदैव विद्यार्थ्यांसोबत असल्याची ग्वाही पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्री श्री.उदय सामंत व उपस्थितांच्याहस्ते विजयी संघ, खेळाडू यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *