शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. ८ :- शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडविण्यासाठी, सर्वांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विद्या प्रसारक संस्था आणि संकल्प सेवा मंडळाच्या डी.एल.बी. डिग्री कॉलेजचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर नरेश मस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला चांगले शिक्षण मिळणे, ही काळाची गरज आहे. शासन त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे. ठाण्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत. येत्या काळात ठाण्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. विकासाबरोबरच पर्यावरण रक्षणही होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी शिक्षण क्षेत्रातील १९७२ मध्ये पाहिलेले  “केजी टू पीजी” (KG TO PG) हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल.

या शिक्षण संकुलामध्ये स्मार्ट क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, ठाण्यातील सर्वात मोठे ग्रंथालय, कॉलेज प्लेसमेंट व करियर गाइडन्स सेंटर त्याचबरोबर विधी महाविद्यालय, मास मीडिया व कम्युनिकेशन महाविद्यालय अशी विविध महाविद्यालये सुरु होत आहेत. गरजूंना शिक्षण देण्याचे काम या संस्थेतून होत आहे, असेच चांगले काम करीत राहावे, शासन आपल्या पाठिशी उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमित काकडे यांनी केले. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री. भोईर यांनी आभार मानले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *