जिल्हा परिषदेच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळ आवश्यक असून कोल्हापुरात सुरु असणाऱ्या क्रीडा स्पर्धांप्रमाणे जिल्हा परिषदांच्या विभाग स्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही देऊन यासाठी ग्राम विकास विभागाच्या सचिवांशी चर्चा करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पोलीस परेड ग्राउंड येथील जिल्हा क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच क्रीडा शपथ घेण्यात आली. यावेळी सन 2022- 23 मधील सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केलेले प्रथम पुरस्कार जिल्हा परिषद (मुख्यालय), द्वितीय पुरस्कार भुदरगड पंचायत समिती व तृतीय पुरस्कार राधानगरी पंचायत समिती यांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्यातील सांघिक भावना निर्माण होऊन ताण-तणाव कमी होण्यासाठी खेळ आवश्यक आहे. या स्पर्धांसाठी  कामातून वेळ दिला, ही आनंदाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे निर्माण झालेले चैतन्य कायम राखून जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चोख सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळाला वेळ देणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या 3 हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी 2 हजार 500 जणांनी या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे, हे कौतुकास्पद असून तितकेजण आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त आहेत, ही समाधानाची बाब आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेण्याबरोबरच दैनंदिन कर्तव्य पार पाडताना देखील हा उत्साह कायम टिकवून कोल्हापूर जिल्हा सर्वच क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित या स्पर्धा अत्यंत चुरशीने खेळल्या जात असल्याचे सांगून खेळाडूंनी उत्तम खेळ खेळण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी या क्रीडा स्पर्धा आयोजना मागील भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून 2015 पासून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यावर्षी 9 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या या स्पर्धांसाठी विकसित भारत संकल्प यात्रा विषय ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत हॉलीबॉल, क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, सायकलिंग या स्पर्धा पार पडल्या असून खो-खो, कबड्डी, धावणे, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक आदी स्पर्धा येत्या दोन दिवसात होणार आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे अंतर्गत 3 हजार 52 शिक्षकेतर कर्मचारी असून या क्रीडा स्पर्धांमध्ये 2 हजार 500 स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात 1 हजार 400 पुरुष व 1 हजार 100 महिलांचा समावेश आहे.

यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा या विषयावर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी शानदार संचलन केले. यावेळी सादर करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान भारत, उमेद, सर्व शिक्षा अभियान, हर घर नल से जल, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री किसान योजना, उज्वला योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आदी योजनांवर आधारित सादरीकरणाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी मानले.

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *