मुंबई, दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील काजू उत्पादकांना विमा भरपाई देण्याबाबत तसेच वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळातील पात्र शेतकरी बागायतदारांना फळ पीक विमा अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कृषी संचालक दिलीप झेंडे, अवर सचिव नीता शिंदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी तसेच वेंगुर्ला व सावंतवाडी तालुक्यातील बागायतदार शेतकरी उपस्थित होते.
हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2022 -23 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील माडखोल, शिरशिंगे, कलंबिस्त, ओवाळीये, वेर्ले, पालपोली, कारिवडे निरुखे व भोम गावातील काजू उत्पादकांची नुकसान भरपाईची मागणी होती. वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण मंडळांतर्गत बागायतदार शेतकऱ्यांचीही अनुदानासंदर्भात मागणी होती. माडखोल येथील शेतकऱ्यांना सावंतवाडीऐवजी आंबोली महसूल मंडळाच्या अंतराची तांत्रिक बाब दुरुस्त करण्यासाठी पीक विमा तक्रार निवारण समितीकडे तक्रारी दाखल करण्याच्या सूचना करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
०००
दत्तात्रय कोकरे/विसंअ/