संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि.4- संत परंपरेतील आद्यपीठ असलेले संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानास यापुढे कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवाच्या तयारी आढावा बैठक वर्षा निवासस्थान येथे पार पडली. या बैठकीला पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सुहास कांदे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आशिमा मित्तल, नाशिक ग्रामीण पोलीसचे पोलीस अधीक्षक प्रविण देशमाने,  नाशिकचे प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, संत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष निलेश गाढवे यांच्यासह हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी राज्यभरातून लाखो वारकरी येत असतात. संत परंपरेतील विश्वगुरु अशी ओळख असणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा पौषवारी सोहळा हा आषाढी आणि कार्तिकी वारी इतकाच भव्य स्वरुपात साजरा होत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परिसरात होणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. या सोहळ्याचे नियोजन करतांना प्रशासनाने याला नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची रंगीत तालीम म्हणून या सोहळ्याकडे पाहावे. या यात्रौत्सवासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने उपाययोजना कराव्यात. तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना स्टिकर पुरवून अशा वाहनांना टोल माफी देण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सव सर्वांच्या समन्वयातून आणि सहकार्यातून नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री श्री. भुसे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या तयारी विषयी माहिती दिली.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *