निसर्गाचा वाटाड्या गेला

मुंबई दि. १८: पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने एका मनस्वी आणि स्वच्छंदी अरण्यऋषीला आपण मुकलो आहोत. निसर्गाची ओळख करून देणारा आपला वाटाड्या गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात की,  सर्वसामान्यांना जंगल आणि एकूणच निसर्गाविषयी गोडी लावण्याचे मोठे काम त्यांनी केले. अरण्य सुद्धा कसं बघायचं, वाचायचं हे त्यांनी शिकवलं.

वन खात्यात काम करताना सुद्धा ते केवळ एक शासकीय अधिकारी म्हणून राहिले नाहीत तर त्यांच्यातला चोखंदळ संशोधक त्यांनी जिवंत ठेवला. त्यांनी केवळ महाराष्ट्र हेच आपलं कार्यक्षेत्र न मानता देशभर भटकंती केली. तेरा भाषांचे ज्ञान असलेले चितमपल्ली हे आदिवासींशी सुद्धा त्यांच्या भाषेत संवाद साधत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जंगल आणि निसर्गा विषयी त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये केलेल्या नोंदी या एक मोठा दस्तऐवज आहे आणि अशा शेकडो डायऱ्यांच्या शास्त्रशुद्ध नोंदीमधून त्यांनी पक्षीकोश, प्राणीकोश आणि मत्स्यकोशाचे लेखन केले. निसर्ग साहित्यात मोठे योगदान दिलेल्या चितमपल्ली यांनी आपल्या आजूबाजूचे पशु-पक्षी आणि निसर्ग यावर प्रेम करायला शिकवलं. त्यांचा हा विचार आताच्या पिढीने पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *