मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमध्ये लोकाभिमुख सोयी सुविधांची उभारणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 7 : सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला, नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून पोलीस ठाणे लोकाभिमुख झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबई पोलीस दलाच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान पोलीस स्थानकातील उत्कर्ष सभागृहात संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची मुंबई पोलीसांची मोठी क्षमता आहे. सायबर गुन्ह्याच्या  एक प्रकरणात 12 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आह. भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आल्या आहेत. या लॅबचे आज लोकार्पण करण्यात येत आहे. डीजिटल अरेस्ट सारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षीत लोकही पैसे देत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. मुंबई पोलीसांच्या उपक्रमांना साथ देणारे अभिनेते आयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे सांगून गुन्हे प्रकटीकरण, पुरवा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. गुन्ह्याच्या तपासकामी तंत्रज्ञान वापरासही आता परवानगी मिळालेली आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोदणी कमी होती  आता त्यामध्ये वाढ झाली आहे, ही एक चांगली बाब आहे. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठीही आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा यासाठी पोलीस स्थानकांमध्ये महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. यामुळे महिलांविषयीचे गुन्हे नोंदवताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण येणार नाही याची खात्री असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पार्क साईट पोलीस स्थानकांची नुतन  इमारत उत्कृष्ट झाली असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, तसेच आझाद मैदन पोलीस ठाण्यामधील उत्कर्ष सभागृहाचे काम ही उत्कृष्ट झाले असून याला पूर्वीचे ऐतिहासिक रुप पुन्हा प्राप्त झाले आहे. शासनाने प्रत्येक विभागाला 100 दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता. या 100 दिवसांच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट पालन मुंबई पोलीस दलाने केले आहे. पोलीस दलाचा कायाकल्प झाला आहे. याशिवाय राज्यात महिला पोलीस ठाणे उभारण्याऐवजी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, अंमलदार यांची नेमणूक करून पोलीस दलाचे कामकाज जास्तीत जास्त महिलाभिमुख करणयात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सुरुवातील मुख्यमंत्री फडणवीस आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत पोलीसांच्या नवीन मोटर सायकल, इंटरेप्टर व्हेईकल, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आझाद मैदान येथील उत्कर्ष सभागृह, पार्क साईट पोलीस स्टेशनची नुतन इमारत, यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच मुंबईतील 87 पोलीस ठाण्यातील महिला व बाल सहाय्यता कक्ष, 216 पोलीस ठाणे व उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृष्य प्रणाली यंत्रणा, पोलीस विभागाची एक्स हॅन्डल, यांचे लोकार्पण, मिशन कर्मयोगी माहिती पुस्तिकेचे अनावरण व मिशनचे कार्यन्वयन, पोलीस प्रशिक्षणाचे कार्यान्वयन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फणडवीस यांनी पार्क साईट पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांच्याशी संवाद साधून नुतन इमारतीविषयीच्या त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि अशाच प्रकारे लोकाभिमूख कारभार करण्यासाठी संपूर्ण मुंबई पोलीस दलास शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमास गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह मुंबई पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *