कामगारांच्या नोंदणी व नूतनीकरण प्रक्रियेमध्ये सुधारणा करुन त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचवा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर, दि 05 :  जिल्ह्यातील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत शासनाने कामगारांच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक विकास योजना हाती घेतल्या आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र कामगारांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने कामगारांच्या नोंदणीबाबत अनेक अडचणी असल्याच्या तक्रारी कामगारांकडून केलेल्या आहेत. या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन ज्या-ज्या कामगारांना नोंदणीबाबत अडचणी येत आहे त्याचे त्यांच्या गावपातळीवरच निराकरण झाले पाहिजे. यादृष्टीने कामगार विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन नोंदणी प्रक्रियेत तात्काळ सुधारणा करण्याचे निर्देश कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

रविभवन येथील सभागृहात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सहायक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे, किशोर दहीफळकर व तालुका स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. सर्वसामान्य कामगार मोठ्या आशेने अर्ज करतात. त्यांच्या हक्काचा असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहचल्या पाहिजे. ज्या दूरदृष्टीने सामाजिक सुरक्षिततेसाठी नोंदणी प्रक्रिया शासनाने निश्चित केली आहे ती प्रत्येक कामगाराला पूर्ण करता आली पाहिजे. असे झाले तरच त्यांना शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य योजना, आर्थिक सहाय्य योजना यांचा लाभ घेता येईल, असे राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी स्पष्ट करुन अधिकाऱ्यांना अधिक दक्षतेने काम करण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *