लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी

मुंबई, दि. १०:  पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या अथक प्रयत्नामुळे लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस मिळणार असून या रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक असलेल्या 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाला गती येणार आहे.

सन 2013 मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली. 100 खाटांचे हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून 31 कोटी 85 लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला होता. परंतु मुख्य अडचण होती जागेची. यासाठी कृषी महाविद्यालयाची 10 एकर जागा निश्चित करण्यात आली. या जागेच्या अधिग्रहणासाठी 3 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीची गरज होती. यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.

त्यांच्या या पाठपुराव्यास यश येऊन पुरवणी मागण्यांमध्ये लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी 3 कोटी 32 लाख 68 हजार 650 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीचे काम मार्गी लागले आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *