सभागृहातील प्रलंबित आश्वासनांची विहित वेळेत पूर्तता करा – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दिनांक 27 : सभागृहात सदस्यांनी विविध संसदीय आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे निराकरण विहित कालमर्यादेत होणे आवश्यक आहे. अतारांकित प्रश्न, औचित्याचे मुद्दे, लक्षवेधी सूचनांची निवेदने, विशेष उल्लेख सूचना, मंत्री महोदयांची आश्वासने, महाराष्ट्र विधानपरिषद नियम 93 अन्वये सूचना याबाबत प्रलंबितता असल्यास ती तातडीने दूर करण्यात यावी. त्याचप्रमाणे एकाच विषयाची विविध संसदीय आयुधांद्वारे विधानपरिषद सभागृह कामकाजात पुनरावृत्ती होऊ नये, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

यासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या सचिवांची महत्वपूर्ण बैठक घेण्यात येऊन आढावा घेण्यात आला. या बैठकीस महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, सचिव (2) मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव (3) डॉ. विलास आठवले, सचिव (4) शिवदर्शन साठ्ये आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रलंबित  कार्यवाहीची पूर्तता विहित कालमर्यादेत व्हावी यासाठी मंत्रालयीन विभागांशी स्मरणपत्रांच्या माध्यमातून सातत्याने संपर्क ठेवावा. विभागाचे सचिव आणि विभागाच्या मंत्री महोदयांचे खाजगी सचिव यांना प्रथम पत्र आणि त्यानंतर विभागाचे मंत्री महोदय आणि राज्याचे मुख्य सचिव यांना दुसरे पत्र पाठविण्यात यावे. यासंदर्भात महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने मंत्रालय – विधान भवन समन्वयासाठी डॅशबोर्ड तयार केला असून तो सातत्याने अद्ययावत करण्यात यावा. सभागृहात एकाच विषयाची वेगवेगळ्या आयुधांमार्फत सभागृहात पुनरावृत्ती होणार नाही याबाबत अत्यंतीक दक्षता घेण्यात यावी, असे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

अधिवेशन कालावधीतील प्रवेशपत्र वितरण प्रक्रिया आणखी कडक करण्यात यावी तसेच सुरक्षा यंत्रणेतील 33 टक्के कर्मचारी वर्ग दर अधिवेशनाला चक्रक्रमानुसार पोलीस महासंचालकांशी समन्वय साधून बदलण्यात यावा, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

००००

मोहिनी राणे/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *