ठाणे जिल्ह्यात ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न

ठाणे दि.२७(जिमाका) :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनाच्या समिती सभागृहात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

याबैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, शिधावाटप उपनियंत्रक भास्कर तायडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तहसिलदार रेवण लेंभे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित आहेत.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या स्वयंपूर्ण, जागरूक आणि सशक्त करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. या अभियानाचा मुख्य उद्देश केवळ आरोग्य सुविधा पुरवणे नसून आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चा आणि कृतीचा अविभाज्य भाग बनवणे हा आहे. आगामी १ एप्रिल २०२६ पासून ३१ मार्च २०२७ पर्यंत राबविल्या जाणाऱ्या या अभियानात जीवनशैलीतील बदल, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळेवर उपचार आणि पुनर्वसन या चार प्रमुख स्तंभांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या मोहिमेची अंमलबजावणी लोकसहभाग, प्रभावी आरोग्य सेवा, प्रशासकीय समन्वय आणि नवोपक्रम या पंचसुत्रीवर आधारित असून, ग्रामपंचायत स्तरापासून राज्यस्तरापर्यंत विविध समित्यांद्वारे याचे काटेकोर संनियंत्रण केले जाणार आहे. विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने ६५.२५ कोटी रुपयांचे भरघोस पुरस्कार जाहीर केले असून, यात राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या जिल्हा परिषदेला ५ कोटी रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. जिल्ह्यात अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाचही तालुक्यांमध्ये जनजागृती मेळावे संपन्न झाले असून १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये या मोहिमेचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

000000000000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *