वन स्टॉप सेंटर: पीडित महिलांच्या हक्काचे माहेरघर; अमरावतीत एका वर्षात १९६ महिलांना मदतीचा हात

संकटग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने केंद्र पुरस्कृत ‘मिशन शक्ती’ योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘वन स्टॉप सेंटर’ (OSC) प्रभावीपणे कार्यरत आहे. महिला व बाल विकास मंत्रालय आणि जिल्हा महिला व बाल विकास विभाग, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमातून गेल्या एका वर्षात तब्बल १९६ पीडित महिलांना विविध प्रकारची मदत व आधार देण्यात आला आहे.

सर्वंकष सुविधा ‘एकाच छताखाली’

कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक छळ, महिला तस्करी, ॲसिड हल्ला किंवा कोणत्याही प्रकारच्या मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जाणाऱ्या महिलांसाठी हे केंद्र म्हणजे एक सुरक्षित आश्रयस्थान ठरत आहे. येथे पीडित महिलांना न्याय, सुरक्षा, कायदेशीर मदत, पोलीस मदत, समुपदेशन, वैद्यकीय सहाय्य आणि तात्पुरता निवारा अशा सर्व सुविधा विनाविलंब उपलब्ध करून दिल्या जातात.

वन स्टॉप सेंटरचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या पीडित महिलेचे वय, शिक्षण, वैवाहिक स्थिती याचा विचार न करता तिला तत्काळ आधार दिला जातो. अमरावती येथे सन २०१७ पासून हे केंद्र अविरतपणे सेवा देत असून, हिंसाचाराने बाधित झालेल्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी हे केंद्र कटिबद्ध आहे.

२४ तास अखंड सेवा आणि संपर्क

संकटग्रस्त महिलांसाठी ही सेवा २४ तास सुरू असते. जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, अमरावती येथे हे केंद्र स्थित असून, मदतीसाठी ९३७१७०८५३५ किंवा ७७२०८८४१९८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, हिंसाचाराने पीडित महिला १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून कधीही मदत मिळवू शकतात.

समाजात कोठेही पीडित महिला आढळल्यास त्यांना या केंद्राचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस विभाग, सामाजिक संस्था, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदत करतात. पीडित महिलांसाठी वन स्टॉप सेंटर म्हणजे हक्काचे माहेरघरच आहे!

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *