नागपूर, दि. १८:- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज नियोजनाप्रमाणे वेळेत पूर्ण होणार असल्याने शनिवार, दि.२१ डिसेंबर २०२४ रोजी अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानसभा कामकाज सल्लागार समितीची, तर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक स्वतंत्ररित्या मंत्रिमंडळ सभागृहात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत, गिरीश महाजन, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, समितीचे विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, डॉ. विलास आठवले आदी उपस्थित होते.
यावेळी विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कामकाज सुरु असून ते वेळेत पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन येत्या २१ डिसेंबर रोजी संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.