निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई

मुंबई, दि. 24 : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मतदानोत्तर जनमत चाचणी (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मत सर्वेक्षण (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केल्यानुसार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7.00 ते दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात कोणत्याही एक्झिट पोलचा निकाल वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज आयोजित करणे आणि प्रकाशित करणे किंवा प्रसारित करण्यास (एक्झिट पोल) प्रतिबंध करण्यात आलेला आहे.

तसेच लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 च्या कलम 126 (1) (ब) नुसार, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांच्या संदर्भात मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेआधी 48 तासांच्या कालावधीत निवडणुकीशी संबंधित मजकूर दाखविण्यास तसेच कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही ओपिनियन पोल किंवा निवडणूक सर्वेक्षण अंदाज प्रदर्शित करण्यास मनाई असेल, असे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

The post निवडणूक काळात मतदानोत्तर जनमत चाचणी जाहीर करण्यास मनाई first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *