सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त, यापैकी ६६० निकाली; २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण

मुंबई, दि. २० : राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २० ऑक्टोबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ६६७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. म्हणजे एकूण ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यस्तरीय जाहिरात पूर्वप्रमाणीकरण समितीकडून विविध राजकीय पक्षांच्या एकूण १०८ जाहिरातींचे प्रमाणीकरण करण्यात आले असून यामध्ये व्हिडिओ, क्रिएटिव्ह व ऑडिओ जाहिरातींचा समावेश आहे.

The post सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ६६७ तक्रारी प्राप्त, यापैकी ६६० निकाली; २७ कोटी ७८ लक्ष रुपयांची मालमत्ता जप्त first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *