बल्लारपूर, दि.१३ – बल्लारपूर शहरात विकासकामे करताना कधीही भेदभाव केला नाही. कुणी छोटीशी सूचना केली तरीही त्यावर अंमल करून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघाला कायम प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काम केले आहे. भविष्यातही त्याच दिशेने तत्पर राहण्यास मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर येथील दिलीप टॉकीज ते श्री मनोज खत्री यांच्या घरापर्यंत तीन कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला हरीश शर्मा, मनीष पांडे, निलेश खरबडे, वैशाली जोशी, प्रभाकर गुंडावार, डॉ जयदेव पुरी, दीपक मिश्रा, मनोज खत्री , संध्या मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘शहरातील इतर रस्त्यांप्रमाणेच उत्तम असा सिमेंट रस्ता व्हावा, अशी इच्छा स्थानिक नागरिकांनी पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती. हरीश शर्मा, निलेश खरवडे, मनीष पांडे यांनी माझ्याकडे निवेदन दिले होते. मला आनंद होतोय की आता त्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे आणि रस्त्याचे काम आज सुरू होत आहे.
मजबूत रस्ते, मजबूत विकास!
तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय, सैनिक स्कुल, बॉटनिकल गार्डन, पाण्याची योजना, बस स्टॅण्ड, रस्त्यांचे विभाजन, विद्यापीठाची स्थापना यापैकी कुठलीही कामे असोत किंवा रस्त्यांची कामे असोत, बल्लारपूरचा विकास कसा होईल याचाच कायम प्रयत्न झाला आहे. रस्त्यांचाच विचार केला तर या शहरात ९० टक्के रस्ते मजबूत झाले आहेत. जे काम महाराष्ट्रात कोणत्याही विधानसभा मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीने केले नाही, तेवढे आपण बल्लारपूरमध्ये केले आहे. अनेकांनी चंद्रपूर जिल्ह्याचे कौतुक केले आहे. पण ते माझे कौतुक नसून जनतेचे आहे. कारण लोकांनी मला निवडून दिले म्हणूनच मला काम करण्याची संधी मिळाली, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
००००००
The post बल्लारपूरला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार first appeared on महासंवाद.