नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. ७ (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे सर्व दारिद्र्य रेषेखालील रुग्ण तसेच विविध योजनांमधील रुग्णांची मोफत व इतर रुग्णांची फक्त 350 रुपये मध्ये सिटीस्कॅन चाचणी होणार आहे. त्यामुळे रुग्णांना कमी दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केला.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून प्राप्त झालेल्या नवीन सिटीस्कॅन मशीन व विभागाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ,  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे सिटीस्कॅन मशीन अत्यंत अत्याधुनिक 128 स्लाईस क्षमतेचे असून दिवसाला 80 ते 100 सिटीस्कॅन करू शकते. सिटीस्कॅन दोन ते पाच मिनिटांमध्ये होऊ शकतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील सगळ्या रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

खासदार विशाल पाटील यांनी मनोगतात सिटी स्कॅन मशीनमुळे रुग्णांचा फायदा होणार असल्याचे सांगून चांगल्या आरोग्य सेवेबद्दल प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

पाचशे खाटांचे रुग्णालय लवकरात लवकर बांधून व्हावे यासाठी पाठपुरावा करत आहे व नवीन बाह्यरुग्ण विभाग इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सिटीस्कॅन मशीन लवकरात लवकर रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, उपाधिष्ठाता डॉ. अहंकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. विकास देवकारे, डॉ. मनोहर कचरे, प्रशासकीय अधिकारी श्री. भोरे व इतर सर्व विभागाचे विभाग प्रमुख परिचारिका वर्ग तसेच रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

The post नवीन सिटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *