कौशल्य विकास विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद – केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी

मुंबई,दि. ३ :  महाराष्ट्र शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केले असून  हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून हे कौतुकास्पद असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी सांगितले.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय येथे आयटीआय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनी गोरेगाव, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उत्तर प्रदेशचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार, के. पी. चौधरी, माजी लोकसभा सदस्य मलुक नागर, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. चौधरी म्हणाले की, आजचा क्षण ऐतिहासिक आहे, कारण आपल्या सर्वांचे आदरस्थान असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूत शिक्षण घेतले त्या वास्तूला त्यांचेच नाव देण्याचा समारंभ आणि ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले त्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने सहा ॲकडमी सुरू करण्यात आल्या आहेत. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन्ही महापुरूषांचे विचार आपल्या युवा पिढीने आत्मसात करून आपल्या देशाला तिसरी आर्थिक महासत्ता बनण्यासाठी, कौशल्यपूर्ण विकास करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकासमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत .मात्र, प्रत्येक राज्यात तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेवून शिक्षण दिले पाहिजे. कोणतेही एक मॉडेल सर्वश्रेष्ट नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम केले पाहिजे.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन व्हावे, म्हणून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून त्याची अंमलबजावणी करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी अनेक योजना सुरू केल्या त्याच धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास विभाग अनेक योजना राबवून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेशचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अनिल कुमार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांच्या कर्मभूमीमध्ये मी उभा आहे, याचा मला खूप आनंद झाला. आजच्या पिढीने काळानुरूप शिक्षण घेवून राज्याचा आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे विचार आपल्याला दिले त्या विचारांवर आपण चालले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी संत गाडगेबाबा स्वच्छ भारत प्रबोधिनीचे प्रतिनिधी मुंबईच्या दिप्ती जाधव, पुणेचे सुरज महाजन, छत्रपती संभाजीनगरचे सागर भारती, नाशिक प्रमोद दुंगी, नागपूरच्या प्रदीप काटकर, अमरावतीचे प्रफुल्ल भुसारी यांचा सत्कार करण्यात आला.

०००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *