शिवसृष्टीच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना सर्वांच्या सहभागातून पुढे न्यावी – उपमुख्यमंत्री

नाशिक दि. ०२ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून महाराजांची कल्याणकारी राज्याची आदर्श संकल्पना लोकसहभागातून पुढे न्यावी. तसेच या प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी दहा कोटी किंवा त्याहून लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

 

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे. तहसीलदार आबा महाजन, माजी खासदार समीर भुजबळ. माजी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शिवाजी महाराजांचा १२ फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा बसविण्यात आला आहे. महाराष्ट्रात सिंहासनावर बसलेला सर्वात मोठा पुतळा हा येवला शहरात असून ही येवलावासीयांसाठी गौरवाची बाब आहे. नाशिक शहरातही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे भव्य अर्धशिल्प बसिवण्यात आले आहे.

 

शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराप्रमाणे शिवसृष्टीची रचना साकारण्यात आली आहे. शिवसृष्टीचे प्रवेशद्वारही आकर्षणाचा एक महत्त्वाचा घटक असून सागवानी लाकडापासून ते तयार करण्यात आले आहेत. जांभा दगड व काळा दगड व राजस्थान येथील चांगल्या प्रतीच्या दगडांचा उपयोग येथे करण्यात आला आहे.  शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घटना येथे चित्र व माहिती ही ऑडीओ व व्हिडियो स्वरूपात येथे नागरिकांना पहावयास व ऐकावयास मिळणार आहे.  शिवकालीन ऐतिहासिक पुस्तकांचे प्रदर्शन येथे भरविले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे ३५० वी जयंती वर्ष आपण यावर्षी साजरे केले. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीचा आदर्श मनात बाळगून आपण सर्वांना पुढे वाटचाल करावयाची आहे. शिवाजी महाराजांसोबत अठरा पगड जातीतील लोक सरदार म्हणून काम करत होते. त्यांचे शौर्य आजही इतिहासात अधोरेखित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना मूलभूत अधिकार दिले आहेत. या अधिकारांचा उपयोग आपण प्रत्येकाने जबाबदारीने केला पाहीजे. नव्या पिढीला महाराजांचे शौर्य, धैर्य, पराक्रम, आदर्श, राज्यकारभाची माहिती व्हावी यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजेत. शिवाजी महाराजांच्या किल्यांचे सर्वंधन पुरातत्व विभागाच्या माध्यामातून केले जाईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व धर्मियांना सोबत घेऊन रयतेच राज्य निर्माण केले मंत्री छगन भुजबळ

मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. या रयतेच्या राजाची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला. त्यानंतर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांनी हे पोवाडे गायले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व सुविधा दिल्या.

येवला शहरात अनेक विकासकामे झाली आहेत यात मुक्तिभूमी, महात्मा फुले नाट्यगृह, प्रशासकीय इमारत, पैठणी पर्यटन केंद्र, विविध स्मारके यांचा समावेश आहे. त्यातील एक महत्वपूर्ण काम शिवसृष्टी असून येवल्याला भूषणावह ठरेल असा शिवसृष्टी प्रकल्प चार एकर जागेत तयार झाला आहे. हा भव्य शिवसृष्टी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून पर्यटक व  शिवप्रेमी येथे येतील, असा विश्वास मंत्री श्री. भुजबळ यांनी व्यक्त केला. शिवसृष्टी प्रकल्पाचे काम अद्याप बाकी आहे. पहिल्या टप्प्यात महाराजांच्या पुतळ्यासह काही महत्त्वा कामे करण्यात आली आहेत.  महाराजांच्या जीवनावरील महत्वाच्या ऐतिहासिक घटना आणि महाराजांचे सेनापती यांची शिल्पे भित्तीचित्रे या म्युरल्सचे कोरीव काम राजस्थानमध्ये सुरु आहे.  शिवकालीन शस्त्रांचे आणि गड किल्ल्यांचे प्रदर्शन शिवकालीन इतिहासाची माहिती देण्यासाठी ऑडियो व्हिज्युअल रूम ,फाऊटन्स व गार्डन ही सर्व कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

येवल्याच्या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन

येवला मतदारसंघात मंत्री श्री. भुजबळ यांनी हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. या विकास कामांच्या सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन र उपमुख्यमंत्री श्री. पवार व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

शिवचरित्रावर आधारित विशेष कार्यक्रमाने जिंकली शिवप्रेमींची मने…

येवला शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांचे चरित्र दाखविणाऱ्या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्यासह कलाकारांनी ‘सरनार कधी रण’ या प्रयोगाचे सादरीकरण केले. गायक आदर्श शिंदे यांनी गीत, तर शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे यांनी पोवाडे तसेच महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार  यांच्या हस्ते शिवसृष्टी येथील कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ड्रोनद्वारे करण्यात आले. यावेळी विद्युत रोषणाई, विशेष आकर्षक फायर शो पार पडला. यावेळी अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर,  अभिनेत्री ऐश्वर्या नारकर,  गायक आदर्श शिंदे, शाहीर प्रा.डॉ.गणेश चंदनशीवे, सरिता सोनवणे, मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ व नंदकिशोर पांचाळ, वास्तूविशारद सारंग पाटील, मक्तेदार पंकज काळे यांचा सन्मान करण्यात आला.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *