‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची २८ व ३० सप्टेंबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. 27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

वातावरणीय बदलांच्या संकटाला तोंड देवून शाश्वत विकास साधण्यासाठी शासनस्तरावर धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करून जिवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स’ देखील गठीत करण्यात आला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. यासाठी जागतिक कृषी परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत 18 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईत सन्मान करण्यात आला. हा उपक्रम, राज्यभरात त्याची अंमलबजावणी याबाबतची माहिती, ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री.पटेल यांची मुलाखत शनिवार दि. 28 आणि सोमवार दि 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

केशव करंदीकर/व.स.सं

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *