सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलमध्येच आता कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी सुविधा

यवतमाळ, दि.22 (जिमाका) : विविध प्रकारच्या कॅन्सरने ग्रस्त रुग्णांना केमोथेरपी द्वारे उपचार केले जातात. उपचाराची ही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना नागपूर गाठावे लागते. यात रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक तथा मानसिक त्रास सहन करावा लागतो. यवतमाळात ही सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलमध्ये कॅन्सर केमोथेरपी  डे-केअर कक्ष सुरु करण्यात आला असून जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

या सुविधचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा.गिरीश जतकर, अधीक्षक डॅा.सुरेंद्र भुयार, सुपर स्पेशालिटी हॅास्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॅा.रोहिदास चव्हाण, कॅन्सर थेरपी तज्ञ डॅा.आशुतोष गावंडे आदी उपस्थित होते.

रुग्णांमध्ये विविध प्रकारचे कॅन्सर आढळतात. त्यात प्रामुख्याने महिलांमध्ये गर्भाशय तथा स्तनाचे कॅन्सर अधिक संख्येने आढळून येते. सोबतच तोंडाचे कॅन्सर, आतड्याच्या कॅन्सरचे सर्वसाधारणे निदान होते. अशा रुग्णांवर केमोथेरपी  उपचार केले जातात. ही उपचार पद्धत खर्चिक आणि मानसिक त्रास देणारी आहे. त्यात जिल्ह्यात सरकारी रुग्णालयामध्ये ही सुविधा नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णास नागपूरला घेऊन जावे लागतात. वारंवार केमोथेरपी  द्यावी लागत असल्याने रुग्ण व नातेवाईकांना त्रास होतो.

यवतमाळातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्ण व नातेवाईकांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळेच ही सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली होती. पालकमंत्र्यांनी अशी सुविधा निर्माण करण्याबात जिल्हाधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांशी चर्चा करून यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. अवघ्या काही महिन्यात केमोथेरपी  डे-केअर कक्ष सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरु झाला आहे.

या कक्षात केमोथेरपी साठी लागणाऱ्या औषधांसह आवश्यक साधने, साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. केमोथेरपी  कक्षासाठी आवश्यक औषधे फार महागडी असतात. ही औषधे नियमित उपलब्ध राहतील, याची काळजी घेण्याच्या सूचना उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांनी केल्या. कक्ष नियमित आणि उत्तमपणे चालविण्यासाठी कॅन्सर थेरपी तज्ञ आवश्यक असते. यासाठी डॅा.आशुतोष गावंडे हे तज्ञ डॅाक्टर या कक्षाला लाभले आहे

कॅन्सर रुग्णांना दिलासा मिळेल – संजय राठोड

कॅन्सर रुग्णांना केमोथेरपी साठी बाहेर जावे लागते. यात वेळ, पैसा जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे ही सुविधा यवतमाळात सुरु करावी, अशी विनंती काही रुग्णांच्या नातेवाईकांनी माझ्याकडे केली होती. या कक्षामुळे यवतमाळात आता सुविधा निर्माण झाली आहे. हा कक्ष जिल्हा व लगतच्या कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा देईल, असा विश्वास आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *