भारताच्या विकासात पारशी समुदायाचे योगदान मोठे – केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री किरेन रिजिजू

जिओ पारशी कार्यशाळा

मुंबई, दि. 14 : भारताच्या विकासात पारशी समुदायाचे योगदान मोठे आहे. जिओ पारशी योजनेच्या माध्यमातून या समाजाचा सांस्कृतिक वारसा, शिक्षण, लोकसंख्या वाढ आणि रोजगाराच्या संधी यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी जिओ पारशी योजनेची माहिती व प्रसारासाठी अशा कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे जिओ पारशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय  अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू बोलत होते.यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य राज्यमंत्री जॉर्ज कुरीयन, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या उपमहानिदेशक ऋचा शंकर, अल्पसंख्याक विकास विभागांच्या प्रधान सचिव रिचा बागला, पारशी मुख्य धर्मोपदेशक उदवाडाचे श्री. दस्तूरजी  आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, उपाध्यक्ष केरसी के. देबू, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान तसेच पारशी समाज बांधव उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, पारशी समाजाच्या सामाजिक  समस्यांवर चर्चा करणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिओ पारशी कार्यशाळा उपयोगी ठरणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून केंद्र सरकार वैद्यकीय सहाय्य, प्रजनन समस्या असलेल्या जोडप्यांचे समुपदेशन, समुदायाचे आरोग्य आदी उपाययोजनांवर भर देत आहे. जिओ पारशी योजनेच्या प्रचारासाठी कार्यशाळा, शिबिरे आणि प्रिंट तसेच सोशल मीडियाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत.

यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, “पारशी समुदायाच्या विकासासाठी केंद्र सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम जिओ पारसी योजना आहे. ही योजना राज्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिओ पारसी योजनेचे उद्दिष्ट आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सहाय्य करणे. पारशी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करणे हे आहे. पारशी समुदायाने पुढे येऊन या योजनेचा लाभ घ्यावा. राज्य सरकार अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी वचनबध्द असून या योजनेची प्रभावी अंमलबजावणी  करण्यात येत आहे.

या कार्यशाळेत पारशी बांधवांना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जिओ पारशी योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *