विश्वसेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करावे – केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू

मुंबई, दि. 14 :  बौद्ध धर्म हा कर्मावर आधारित आहे. या धर्मात हिंसा नावाची कुठलीही गोष्ट नसून भगवान बुद्ध यांनी जगाला अहिंसा, दया, करुणा हा संदेश दिला आहे. विश्व सेवा करण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार आत्मसात करायला हवे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाद्वारे ‘बुद्धांचा मध्यममार्ग – जागतिक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ या विषयावर मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर येथे विशेष परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी श्री. रिजिजू बोलत होते. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. दामेंडा पोरजे यांच्यासह भिख्खू व अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बुद्ध यांचा मध्यम मार्ग वैश्विक नेतृत्वासाठी मार्गदर्शक’ या विषयावरील ही परिषद महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीत होत असल्याचे सांगून श्री. रिजिजू म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सुंदर असे संविधान भारत देशाला दिले आहे. या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे.

महाराष्ट्रात अल्पसंख्याक व बौद्ध धर्मासाठी काम करणाऱ्या संस्थांनी शासनाच्या मदतीने राज्यातील प्रत्येक प्रादेशिक विभागात संविधान सभागृह तयार करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच अल्पसंख्याक समुदायासाठी अभ्यास केंद्र, नोकरी करणाऱ्या महिला व विद्यार्थींनीसाठी वसतिगृह उभारणीकरिता प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी श्री. लालपुरा, श्री. कांबळे, श्री. पोरगे यांनी मनोगतात या परिषदेच्या आयोजनाची भूमिका मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *